पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे अख्खा मालदीव देश कामाला लागला, एवढी त्यांच्यात ताकत आहे. पण असच काही जर शरद पवारांनी केलं असतं तर काही फरक पडला असता का? असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
ते सांगली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “मालदीच्या राष्ट्रप्रमुखाने निवडणुकीत भारत आऊट अशी घोषणी दिली आणि चीनच्या मांडीवर जाऊन बसले. मोदीजी यावर चकार शब्दही बोलले नाहीत. त्यानंतर एक दिवस अचानक मोदीजींचा एक फोटो आला ज्यात त्यांनी लक्ष्यद्वीपला भेट दिली होती. हा फोटो पुढे आल्यानंतर अख्खा मालदीव कामाला लागला. सगळे गुडघ्यावर येऊन माफी मागायला लागले. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि याच पर्यटनाला भारताचे ५० टक्के लोक जात असतात. त्या सर्व लोकांनी तिथले बुकींग रद्द केले. ही आपल्या नेतृत्वाची ताकद आहे.”
ते पुढे म्हणाले की, “देशात असा एक तरी नेता आहे का ज्याने एक फोटो काढला आणि अख्खा देश कामाला लागला. समजा जर शरद पवारांनी तिथल्या समुद्रात जाऊन डुबकी मारली असती तर काही फरक पडला असता का?” असा सवाल करत त्यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. तसेच जे लोक मोदींच्या विरोधात बोलतात ते त्यांचं काहीही करु शकत नाही. कारण मोदी साहेबांमध्ये जो प्रामाणिकपणा, हिमंत आणि धमक आहे ती इतर कुठल्याच नेतृत्वात नाही, असेही ते म्हणाले आहेत.