पाचोरा(वार्ताहर) दि,१२- समाजातील सर्व वंचित उपेक्षित घटकांना विकासाच्या वाटेवर पुढे आणणार असून समाजातील दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बांधवांचे जगणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा येथे दिव्यांग बांधवांच्या साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार संभाजी पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल ,माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील,संजय पाटील( भुरा आप्पा),शहर प्रमुख किशोर बारवकर, बंडू चौधरी, डॉ भरत पाटील ,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन,माजी नगरसेवक राम केसवानी, दत्ता जडे,बापू हटकर,गंगाराम पाटील, अयुब बागवान, पंढरी आण्णा पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदल परदेशी, बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, राहुल पाटील,युसुफ पटेल आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यातील दिव्यांग बांधवांची संख्या पाहता आमदार निधीतून उपलब्ध होणारी दहा लाखाची रक्कम अतिशय तोकडी होती.त्यामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी १० लाखा वरून ३० लाख रुपये करण्याचा सुधारित शासन निर्णय घेण्यास आपण भाग पाडले याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच आमदार महोदयांना पर्यायाने दिव्यांग बांधवांना होणार असल्याचे सांगत आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आधी भडगाव तालुक्यासाठी १० लक्ष रुपयांचे साहित्य वाटप केल्याचे सांगत आज पुन्हा या तीस लाखाच्या निधीतून सुमारे सहाशेहून अधिक दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करत असल्याचे सांगितले यामुळे त्यांचे जीवन सुलभ होण्यास मदत होईल अशा पद्धतीचे साहित्य वाटप होत आहे असे सांगून, दिव्यांगांच्या तपासण्या यानंतर तालुकास्तरावर मेडिकल तपासणी शिबिरे घेऊन कराव्यात व तेथेच प्रमाणपत्र दिले तर एकही दिव्यांग बांधव शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगितले. पुरवठा विभागाने त्यांच्याकडील शिधापत्रिका अपडेट करून दिव्यागांना त्यांचा लाभ द्यावा तसेच संजय गांधी योजनेच्या पेन्शनचा लाभ दिव्यांग बांधवांना देण्यात प्रशासनाने लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी केल्या.या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्ह्याला तत्पर कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्यामुळे विकास कामांची गती वाढल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सुमारे सहाशे दिव्यांग बांधवांना तीस लाख रुपये आमदार निधीतून थ्री व्हील सायकल, कृत्रिम अवयव आदी प्रकारच्या साहित्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही साहित्याचे वाटप जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोंढळा रोड वरील तुळजाई जिनिंग मध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख एस पी गणेशकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद – आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगांसाठी मिळणारा दहा लाखाचा निधी आता तीस लाख रुपये झाला असून आमदारांच्या प्रयत्नाने शासनाच्या नियमात बदल झाला असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी म्हणाले. त्यांनी दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत,नगरपालिका पंचायत समिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय उभा करावा असे सांगितले. आगामी काळात तालुकास्तरावर दिव्यांग पुनर्वसन व मदत केंद्र उभारणी करिता लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत एका चांगल्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.