पाचोरा -तालुक्यातील वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकरी भागवत उखर्डू पाटील वय वर्षे (६२) हे त्यांच्या मालकीच्या सार्वे शिवारातील गट नंबर १७४ मध्ये नियमितपणे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतीकाम करण्यासाठी गेले असता त्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळून जात असतांनाच अचानकपणे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व काही कळायच्या आतच ते जमीनीवर कोसळले ही घटना घडली तेव्हा त्यांचा मुलगा भावेश हा नुकताच जेवणाचे डबे घेण्यासाठी घरी आलेला होता.
भावेश हा घरुन डबे घेऊन शेतात गेला असता त्याला त्याचे वडील भागवत पाटील हे जमीनीवर पडलेले दिसून आले हे दृष्य पाहून भावेश याने प्रसंगसावधानता दाखवत नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी व मदतीसाठी शेजारच्या शेतकऱ्यांना आवाज देऊन बोलावून घेतले व नंतर जवळ जाऊन पाहिले असता भागवत पाटील हे मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांना घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वडगाव आंबे गावाच्या पोलीस पाटील सौ. रेखाताई वाघ यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे व चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून रितसर शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या घटनेबाबत वडगाव आंबे गावासह पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागवत पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मयत भागवत पाटील यांना विजेचा धक्का कस लागला हे अद्याप कळु शकले नसल्याचे खात्रीलायक वृत्त असून विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समोर येईल असे समजते असे असले तरी विद्युत वितरण कंपनीचा भोगळ कारभारामुळे अशा बऱ्याचशा घटना घडत आहेत असा आरोप सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला असून वर्षानुवर्षांपासून जुनाट झालेल्या विद्युत वाहिनीच्या तार, उघडे सताड कटआऊट बॉक्स, तुटलेले कटआऊट, ट्रांसफार्मर जवळ ए. बी. स्वीच कि कमतरता अशा बऱ्याचशा तांत्रिक बाबी शेतकऱ्यांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचे जनमानसातून तसेच सुज्ञ नागरिकांतून ऐकायला येत आहेत.