नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. त्यावर हिंदू धर्माचा अपमान हीच काँग्रेसची ओळख असल्याचा घणाघात भाजपने केला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनादेखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे हे तिनही नेते प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. करोडो भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे. मात्र, पण गेल्या काही वर्षांत भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. केवळ निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी अर्ध-निर्मित मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०१९ सालच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या विश्वासाचा आदर करून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि आरएसएसने दिलेले निमंत्रण नाकारल्याचे पत्रकात म्हटले आहे.