रत्नागिरी : विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारासाठी लढाई केली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केला आहे. सोमवारी रत्नागिरी येथे सुरु असलेल्या शिवसंकल्प अभियानात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावर शेळ्या हाकणारा नाही. स्वच्छता अभियान सुरु केलं तर पोटदुखी सुरु झाली. कारण लोकं त्यात सहभागी होऊ लागले. पण ही डीप क्लिन ड्राईव्ह स्वच्छता मोहिम संपुर्ण महाराष्ट्रात राबवू. त्याचबरोबर जे कुणी या विकासाच्या विरोधात उतरतील त्यांचीदेखील सफाई करु.”
“चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी इंडिया आघाडी खुशीत गाजरं खात होती. परंतू, देशातील लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर देत मोदीजींची गॅरंटी स्वीकारली. त्यामुळे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा इंडिया आघाडीतील माणूस आपल्याला पाहिजे की, या देशासाठी एक एक दिवस समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे हा विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला, राज्याला आणि जिल्ह्याला काय दिलं हे महत्त्वाचं आहे,” असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे मोदीजींनी देशात ‘अबकी बार ४०० पार’ अशी घोषणा दिली त्याचप्रमाणे ‘फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४५ पार’ अशी आपल्या महाराष्ट्राची घोषणा आहे. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे.”
“आज आपल्याकडे खरी शिवसेना आहे. त्यामुळे हे शिवसैनिक हिंदुत्वाच्या शत्रुंचा आणि विघ्नसंतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खोट्याच्या कपाळी गोठा अशी म्हण आहे. ही म्हण कोकणी माणसं येणाऱ्या निवडणुकीत खरी करुन दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारासाठी लढाई केली,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.