भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एक नवा इतिहास रचणार आहे. भारताचे पहिले सौर मिशन लवकरच यशस्वीरित्या एल १ पॉइंटवर पोहोचणार आहे. गतवर्षी २ सप्टेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल १ प्रक्षेपित करण्यात आले होते. आता ते ध्येय गाठण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सूर्याकडची भारताची वाटचाल अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. दि. ०६ जानेवारी रोजी आदित्य एल १ हे इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले यान लवकरच L-1 पॉईंटवर पोहोचेल, अशी माहिती पीटीआयकडून Xवर देण्यात आली आहे.
फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार सूर्याची पहिली झलक
आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली असून हे VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. त्यानंतर L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होऊन त्यातील सर्व उपकरणे सक्रिय होतील. आणि याद्वारे सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे. याआधी, यासर्व यंत्रणांची इस्त्रोकडून चाचणीदेखील घेण्यात येणार आहे. एकंदरीत, आदित्य एल १ द्वारे सुर्याविषयी कुठल्या अज्ञात गोष्टींचा उलगडा होणार याकडे खगोलप्रेमींचे लक्ष असणार आहे.