जळगाव दि.1 (प्रतिनिधी) – खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे दि. ५, ६, ७ जानेवारी २०२४ दरम्यान रंगणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या शास्त्रीय व उपशात्रीय गायनाची मेजवानी रसिकांसाठी असेल. सोबतच दुसऱ्या सत्रात पं. अनुज मिश्रा व नेहा सिंग मिश्रा यांची कथकवरील जुगलबंदी जळगावकर श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, होस्टिंग ड्युटी, प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा रसिकांना आस्वाद घ्याव्या असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कलावंतांचा परिचय
प्रथम दिन प्रथम सत्र
ज्ञानेश्वरी गाडगे (शास्त्रीय व उपशात्रीय गायन)
२२ व्या बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात एका बालकलाकाराच्या शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. ज्ञानेश्वरी गाडगे हिने लहान वयातच तिचे पहिले गुरु व वडील श्री. गणेश गाडगे यांच्याकडे शिक्षण घेतले. सध्या मुंबईच्या प्रसिद्ध गायिका अपूर्वा गोखले यांच्याकडे ती आपल्या गायनाचे धडे गिरवीत आहे. लहान वयातच ज्ञानेश्वरीने मराठी स्टार प्रवाहच्या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. नुकताच झी टीव्ही प्रस्तुत सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये भाग घेऊन तिच्या अभिजात संगीताच्या गायकीने सर्व रसिकांची मने तिने जिंकली आणि प्रत्येक रसिक तिची गायकी ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू निघत होते. त्यावेळी तिला सरस्वती मातेच्या नावाने ओळखले जात होते. आशाताई भोसले यांनी तिचे गाणे ऐकल्यानंतर गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्यानंतर कौशिकी चक्रवर्ती व त्यानंतर तुझा नंबर लागतो असे म्हटले होते, आणि ज्ञानेश्वरी अभिजात संगीतास पुढे घेऊन जाईल इतका मोठा आशीर्वाद आशाताईंनी तिला दिला होता. शंकर महादेवन यांनी तिला षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांच्यासोबत गाण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे अनु मलिक तिच्या घरी येऊन गेले त्यांना ज्ञानेश्वरी कुठे रियाज करते हे पाहिजे होते. ज्ञानेश्वरीला त्यांनी खूप आशीर्वाद दिले त्या वेळचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनीही तिचे खूप कौतुक केले. आत्तापर्यंत ज्ञानेश्वरीने नासिक, रत्नागिरी, बंगलोर, पुणे, चिपळूण, ठाणे, औरंगाबाद, मुंबई इत्यादी ठिकाणी आपली कला सादर करून रसिकांचे आशीर्वाद मिळवले आहेत. ज्ञानेश्वरी ला या बालगंधर्व संगीत महोत्सवात तिची लहान बहिण कार्तिकी गाडगे संवादिनीची साथ करणार आहे, तर रामकृष्ण करंबेळकर हे तबल्याची साथ करणार आहेत. कार्तिकी वयाच्या पाचव्या वर्षांपासून वडिलांकडे हार्मोनियम शिकत होती. आता ती प्रख्यात संवादिनी वादक व गुरु आदित्य खवणेकर यांच्याकडे गुरु शिष्य परंपरेनुसार घरंदाज पद्धतीने हार्मोनियम शिकत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये कार्तिकीने ज्ञानेश्वरीला साथ संगत केली आहे, व अनेक पारितोषिक पटकावली आहेत. अशा या हरहुन्नरी दोन्ही बालकलाकारांची संगीत सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.
प्रथम दिन द्वितीय सत्र
पं. अनुज मिश्रा व नेहा सिंग मिश्रा (कथक जुगलबंदी)
अनुज बनारस घराण्याच्या एका प्रतिथयश सांगीतिक व नृत्यात कार्य करणाऱ्या कुटुंबाचा वंशज आहे. अनुजच्या घराण्यात अत्यंत उत्तम असे कलाकार होऊन गेलेत. अनुज १३ व्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. प्रख्यात सारंगी वादक पं. शिव किशोर मिश्रा व तबलावादक नान्हु मिश्रा व कथक नृत्य कलाकार पं. अर्जुन मिश्रा यांच्या संस्कारांनी मोठा झाला. सर्वप्रथम पं. रघुनाथ मिश्रांकडून अनुजने बनारस घराण्याचे तबला वादनाचे धडे गिरवले. त्यानंतर लखनऊचे उस्ताद गुलशन भारती यांच्याकडून अभिजात संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या १७ व्या वर्षापासून अनुजने कथक नृत्याचे धडे गिरवणे सुरू केले ते पंडित अर्जुन मिश्रा यांच्याकडून. कथक मध्ये अनुजने खैरागड येथील इंदिरा कला संगीत विद्यापीठातून एमए केले ३० वर्षीय अनुज लखनऊ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारा एक अत्यंत वरच्या दर्जाचा कलाकार आहे. भारतातील उत्कृष्ट कथक नृत्य कलाकारांपैकी अनुज हा उत्तम सादरीकरण करणारा कलावंत म्हणून नावारूपास आलेला आहे. अत्यंत उमदार देखणा नृत्य कलावंत म्हणून अनुज प्रसिद्ध आहे. तांडव व लास्य या दोन्ही प्रकारच्या नृत्यशैलीवर अनुजचे प्रभुत्व असून त्याचे चक्कर अचूक व जोशपूर्ण असतात. अनुज अतिशय द्रुत गतीत सुमारे १०० पेक्षा जास्त चक्कर मारताना अचूक समेवर येण्याचा त्याचा हातखंडा अद्भुत आहे. लयीवर व ताल तालावर अनुजची घट्ट पकड आहे. केवळ तीन तालातच नृत्य न करणारा अनुज एकताल, धमार, झपताल, लक्ष्मीताल, व पंचमसवारी तालावरही उत्तमरित्या कथकचे सादरीकरण करतो. अनुच कडे अस्सल लखनऊ घराण्याचे तुकडे, तोडे, परण या सर्व प्रकाराचे भंडार आहे. त्यामधील काही तुकडे तोडे तर १८ व्या शतकातील सुद्धा आहेत. अत्यंत क्लिष्ट तत्कार, रॅपिड चक्र, तालातील सूक्ष्मता परणांचे सादरीकरण, अचूक टाइमिंग, आणि समवेवर येणे हे अनुजच्या नृत्याचे वैशिष्ट्य म्हणता येतील. अनुजच्या नृत्य शैलीने रसिक नुसते भारावूनच जातात असे नाही, तर त्यांना खेळवून ठेवण्याचे सामर्थ्य अनुज मध्ये आहे. अनुजने आतापर्यंत काळा घोडा फेस्टिवल, कोणार्क फेस्टिवल, लखनऊ महोत्सव, सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ताज महोत्सव, यासह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, यूएसए, नॉर्वे, लेबेनॉन, पोलंड, आणि स्वित्झर्लंड येथे आपली कला प्रदर्शित केली आहे. संगीत नाटक अकादमी त्रिवेंद्रम केरळ युवक महोत्सवात सुवर्णपदक, सुर सिंगार संसादचा सिंगार मणी पुरस्कार, उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार इ. ने अनुज सन्मानित आहे. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय डान्स कौन्सिल वर अनुज सदस्य आहे. तसेच आयसीसीआर सोबतही तो संलग्न आहे. लखनऊ येथील कथक डान्स अकादमी आर्टिस्टिक डायरेक्टर म्हणून अनुज सेवाव्रत आहे. सन २००६ साली बालगंधर्व महोत्सवात पं. अर्जुन मिश्रा यांच्यासोबत अनुज व त्याची बहीण स्मृती हे दोघेही आपले सादरीकरण करून गेलेले आहेत.
नेहा सिंग मिश्रा
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली कलावंत म्हणून नेहा सिंग मिश्रा सर्वांना सुपरिचित आहे. वाराणसीच्या एका सांगितिक घराण्याची परंपरा लाभलेली नेहा पं. अर्जुन मिश्रा यांची सून असून १३ व्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहे. नेहाचे कथक शिक्षण सुमारे १३ वर्षांपासून पं. अर्जुन मिश्रा व पती पं. अनुज मिश्रा यांच्याकडेच सुरू आहे. नेहाने अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला आहे. अनेक नृत्य दिग्दर्शक व प्रमोटर्स यांच्या कंपनीसाठी नेहाने अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम सादर केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने करीन सपोर्त, रुक्मिणी चटर्जी, फ्रान्सचे ख्रिश्चन लेडॉक्स वेबर, लता पाडा, उषा गुप्ता (कॅनडा रोजेला फेनील व मायादेवी (इटली) कारलो व सौरा कॅसे डे ला, इंडिया टिटीबी फेरीक्युटो (स्पेन) मल्लिका साराभाई, कुमुदिनी लाखिया, पं. बिरजू महाराज, मुजफ्फर अली, इ. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरस्कारांनी ती सन्मानित आहे. इंडियन रेल्वेच्या अनेक स्पर्धांमधून ती चमकली आहे. भारतातील ताज महोत्सव, लखनऊ महोत्सव, कथक महोत्सव, कोणार्क व काला घोडा फेस्टिवल, तसेच फेज फेस्टिवल (मोरक्को) कॅनडा डान्स फेस्टिवल , बिनाले डान्स फेस्टिवल (स्पेन) त्याचप्रमाणे युनायटेड किंगडम, यूएसए, दुबई, साऊथ आफ्रिका, जर्मनी, स्पेन, इटली, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इ. ठिकाणी तिने आपले कार्यक्रम सादर केले आहेत. नेहा, पं. अर्जुन मिश्रा डान्स अकादमी मध्ये सह नृत्य दिग्दर्शिका असून दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी, विद्यार्थिनींना ती मोफत शिक्षण देत असते
अशा या हरहुन्नरी दोन्ही कलाकारांची कथक जुगलबंदी सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे