मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर सरकारकडून अद्यापही काहिचं हालचाली दिसत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचं बीड च्या भव्य सभेत जाहीर केलं होतं त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मैदानाची पाहणी करून उपोषणाची तयारीला लागले आहेत.दरम्यान भाजपाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणा संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे या वक्तव्याने सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील
भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,मराठा समाजाचा डाटा गोळा करायला निदान एक वर्षांचा कालावधी तरी लागू शकतो. तसेच मराठा आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ते देता येणार नसल्याचं वक्तव्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.बोलतांना पुढे ते म्हणाले की,महाराष्ट्रातील मराठा लोकांची संख्या तीन साडे तीन कोटी आहे. त्यामुळे मराठा समाजाचा डाटा गोळा करण्यास वेळ लागू शकतो असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कायदा पास करायला एक तास पुरेसा
मराठा समाजाचा डाटा गोळा करण्यास वेळ लागू शकतो असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील म्हणाले की आमची मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसीतून सरसकट आरक्षणाची आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे सिद्ध झाले आहे.संपूर्ण राज्यभरात ५४ लाख पुरावे मिळाले आहेत. या संदर्भात कायदा पास करायला एक तास पुरेसा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही वरचे ते कोर्टातले आरक्षण मागितले नाही. ते पन्नास टक्क्यांचे वर जाते म्हणून ते टिकणारे नाही. मागासलेपण सिद्ध करायला एक वर्षे पन्नास वर्षे देखील लागू शकतील. चंद्रकांत पाटील आहेत म्हटल्यावर नक्कीच पन्नास वर्षे लागतील अशी टीका जरांगे पाटील यांनी करत चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.