जळगाव, (प्रतिनिधी) – सन २०१६-१७ पासून आजपर्यंत ज्या घरकुलांना मंजुरी देण्यात येऊन देखील प्रत्यक्षात बांधकामे सुरु न झालेल्या घरकुलांचे बांधकामे सुरु करणे व यावर्षी शबरी, रमाई, आणि मोदी आवास योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या घरकुलांचे हप्ते वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचनेनुसार बुधवार,२७ पासून विशेष घरकुल मोहीम सुरु करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरु न झालेल्या घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात घेऊन तसेच नव्याने सन 2023 24 करिता रमाई शबरी व मोदी आवास या योजनांचे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेचे नव्याने मंजूर करण्यात आलेले घरकुले यांचे बांधकामे सुरू करण्यासाठी 27 डिसेंबर ते 5 जानेवारी यादरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी शाखा अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे सहभागी होत आहेत. ज्या मंजूर घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. ती बांधकामे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्या त्या गावात जाऊन घरकुलांचा लेआउट आखून देऊन जेसीबीच्या मदतीने तात्काळ खड्डे खोदणे तसेच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जुळवा जुडवा करून ती बांधकामे तात्काळ सुरू करण्याचे नियोजन या मोहिमेतून आखण्यात आले आहे. या मोहिमेत सरपंच व सचिव व ग्रामपंचायत यंत्रणेने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी केले आहे.