नवी दिल्ली- सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. ‘नागरिकत्व कायद्यामुळं भारतातील कुठल्याही धर्माच्या नागरिकाचं नुकसान होणार नाही. कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळं या संदर्भातील अफवांना बळी पडू नका. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. शांतता राखा,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा नुकताच संसदेत मंजूर करण्यात आला. मात्र, नागरिकत्व देताना मुस्लिमांना वगळण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळं या कायद्यास विरोध होत आहे. ईशान्येकडच्या राज्यांनी सामाजिक समतोल बिघडून जाण्याच्या भीतीनं आंदोलन सुरू केलं आहे. तर, जामिया मिलिया व अलीगड मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना हिंसक वळण लागलं आहे. या प्रश्नी विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.