पुणे दि.२५ – पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १०० व्या नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारे ठरेल, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, डॉ.पी.डी. पाटील, प्रकाशशेठ धारीवाल, माजी आमदार विलास लांडे, कृष्णकुमार गोयल,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राजकुमार साकला, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, मराठी नाट्य संमेलनाला गौरवशाली इतिहास आहे. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’च्या माध्यमातून मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माणसाचे नाट्यवेड सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच नाट्य चळवळ पुढे जाते आहे. प्रत्येक शहरात चांगले नाट्यगृह असावे असा प्रयत्न सुरू आहे. नाट्यगृहाच्या माध्यमातून नव्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत असते. त्यांना चांगल्या सुविधांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहाच्या देखभालीकडे संबंधितांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, मराठी नाटकांनी मनोरंजनासोबत सामाजिक, राजकीय, कौटुंबिक विषयांना स्पर्श केला. नाटकांमध्ये समाजाचे प्रतिबिंब असते. कोरोनामुळे नाट्यसृष्टीला फटका बसला आणि काहींचे संसार विस्कळीत झाले. अशावेळी शासनाने कलाकार आणि पडद्यामागच्या कलावंतांनाही मदत करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक अडचणींना सामोरे जात नाट्य चळवळ इथवर पोहोचली याचा मनापासून आनंद आहे, असे श्री.पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहराची अनेकांच्या प्रयत्नातून प्रगती झाली. सर्वांच्या सहकार्याने शहराचे विकसित स्वरूप समोर आले आहे. या विकासाला साहित्य, कला, संस्कृतीची जोड असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने हे संमेलन उपयुक्त ठरेल आणि उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिक नगरीकडे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने नाट्य संमेलनासाठी १० कोटी रुपये दिले असून या निधीतून नाट्य परिषद विविध उपक्रम राबविणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही नाट्य संमेलनासाठी आवश्यक सहकार्य करावे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
प्रास्ताविकात श्री.भोईर यांनी नाट्य संमेलनाच्या अयोजनाविषयी माहिती दिली. नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या दोन दिवसांच्या कालावधीत विविध प्रकारच्या ६४ कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन आणि पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जातीधर्माला सोबत घेत समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या जीवनावरील चित्रपट नवीन पिढीने आवर्जून पहावा. महापुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीत समाज घडविण्याचे कार्य कशाप्रकारे केले याचे दर्शन नव्या पिढीला याद्वारे घडेल असेही श्री.पवार म्हणाले.