मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने खडसे समर्थक नाराज
जळगाव ;- नुकताच देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला गेला . यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवारांना मंत्रिपदाचे गाजर देण्यात आले. त्यातच अनेक प्रकरणातून क्लीनचिट प्राप्त भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना डावलल्याने त्यांनीही आता मंत्रिपदात रस नसल्याचे सांगत खदखद व्यक्त केली आहे. तसेच अनुभवी आणि स्पष्टवक्ता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना अवघ्या तीन महिन्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा विस्तारात स्थान न दिल्याने समर्थक नाराज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे यांचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव काही जणांचा असल्याने त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागत असल्याचे बोलले जात आहे .
फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र नाथाभाऊ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अन्यायाची भावना काही भाजपा गोटात दिसून येते. माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे.विरोधी पक्षातून भाजपात प्रवेश करुन मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांबद्दल भाष्य करताना एकनाथ खडसेंनी मनातील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली आहेच. आमच्याकडे चार-पाच वेळा निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही. स्वाभाविक ते नाराज होतात. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्ष हितासाठी, पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेतले जातात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागत असतात अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. खडसे सध्या दिल्लीत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिला नाही असे म्हटले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र पुन्हा एकदा खडसेंना डावलण्यात आले आहे. विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस, शिवसेना आता भाजपामध्ये येत त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना अनेक ऑफर आल्या. तुमचा पक्ष सत्तेत कधीच येणार नाही असे सांगितले गेले. मात्र आज आम्ही सत्तेत आलो असल्याचे खडसेंनी सांगितले .
जमीन प्रकरण यासह अनेक आरोपांमधून खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते या उक्तीनुसार एकनाथराव खडसे यांना मंत्रिमंडळ विस्तारात योग्य स्थान देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी दिले होते . मात्र अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीसाठी एकनाथराव खडसे यांचा विचार न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . त्यांच्यासारख्या अनुभवी आणि खान्देशात भाजपाची पताका रोवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे , त्यांनाच डावलने चुकीचे असल्याचे बोलले जात आहे . एकंदरीतच त्यांचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव रचल्याचे बोलले जात आहे.यामुळे मात्र जळगावच्या विकासावर परिणाम झाला आहे.