मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी अखेर प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यापार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत जब्बार पटेल यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. पटेल यांच्या नावावर आम्ही मागेच शिक्कामोर्तब केलं होतं. आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेऊन पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येत असल्याचं कांबळी म्हणाले. १००व्या नाट्यसंमेलनाबाबत काही ठरलं नव्हतं. त्यामुळे हे संमेलन पुढे जाईल की काय? अशी चर्चा होती. आता तो विषयही राहिला नाहगी. राष्ट्रपती राजवट उठली आहे. राज्यात नवं सरकार आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी असून ते नाट्यपरिषदेला सर्व सहकार्य करतील अशी आशा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, १००व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांचाही अर्ज आला होता. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षपदाची चुरस वाढली होती. संमेलनाध्यक्ष कोण होईल? याकडे नाट्यप्रेमींचं लक्ष लागलं होतं.