जळगाव दि. १९ प्रतिनिधी –“भारताला मूलभूत विज्ञानामध्ये संशोधकांची नितांत गरज आहे. आपला देश हा तंत्रज्ञान वापराबाबत जगात अग्रेसर देश आहे, मात्र विज्ञानाच्या मूळ विषयांमध्ये आपले संशोधन कमी आहे.” असे मत जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी व्यक्त केले. अनुभूती इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, सतत शिकत राहणे हा विद्यार्थ्यांचा स्थायी स्वभाव असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकण्याऐवजी विज्ञान जगायला हवे. कृषी, उद्योग आणि शिक्षण या तीन क्षेत्रात दूरदृष्टी असणारे माझे मित्र भवरलालजी जैन यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मुंबई येथील सुप्रसिद्ध मधुमेह व आहार तज्ज्ञ डॉ. सतीश नाईक यांनी संवाद साधला. डॉ. सतीश नाईक म्हणाले की, स्मरणशक्ती हा उपायाचा भाग नाही. स्मरणशक्तीसाठी तुमचा निर्धार पक्का असावा लागतो. जेव्हा विद्यार्थी स्वतःला जाणून घेतात तेव्हाच विकासाचा मार्ग मोकळा होतो. स्वतःच्या दिनचर्येला शिस्त लावल्यास आरोग्य मानसिक व शारीरिक दृष्ट्या उत्तम राखले जात असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देबासिस दास यांनी केले. याप्रसंगी अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.