नागपूर, दि.१३ : आरोग्य विभागातील गट ‘क ‘ आणि ‘ ड’ संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये तीन सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे.
२०२१ मध्ये या संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु नव्याने जाहिरात देऊन पदभरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रक्रियेनुसार टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स व्यवस्था करण्यात आलेली होती.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदांसाठीची परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली. ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रा. डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन प्रत्येक परीक्षा केंद्रावर संनियंत्रण ठेवण्यात आले.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये आरोग्याच्या संदर्भात तातडीच्या वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी स्वतःचे लेखनिक किंवा विभागाकडील लेखनिक उपलब्ध करुन देण्यात आले होते. संवर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर त्या उमेदवाराने सोडविलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका दि. १५.१२.२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांना चुकीचे प्रश्न, प्रश्नांची चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी आक्षेप / हरकती नोंदविण्यासाठी दि. १८.१२.२०२३ ते २०.१२.२०२३ या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहे. आक्षेप / हरकतींचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही परीक्षा पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी विभागातील अधिकारी व टिसीएस यांचे प्रतिनिधींशी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. या भरती प्रक्रियेमुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे .