जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आजपासून आठवडाभर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार आज रविवारी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. परंतु खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात आपला कापूस किंवा इतर काही माल ठेवला असेल तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
आज २६ नोव्हेंबर रोजी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे. २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट असणार आहे.
जळगाव जिल्ह्यात आठवडाभर पावसाची शक्यता
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधी दरम्यान, मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, तापमानात घट होऊ शकते. जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत गारवा निर्माण झाला.