15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. परकीय इंग्रज जाऊन स्वकीय भारतीयांचे शासन आले. परंतु राज्यसकट हाकलण्यासाठी नियमावली किंवा आचारसंहिता असणे आवश्यक होते. त्यासाठी संविधान समितीचे गठन करण्यात येऊन त्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्या अंतर्गत अनेक उपसमिती नेमण्यात आल्या. त्याच पैकी संविधान मसुदा समिती नियुक्त करण्यात आली. त्यात एकूण सात सदस्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. या समितीतील सदस्य या ना त्या निमित्ताने हजर राहत नव्हते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता.
त्यामुळे शेवटी फक्त एकटे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबच समितीचे सर्वेसर्वा राहिले. त्यांनी आपल्या शरीर प्रकृतीची परवा न करत दोन वर्षे 11 महिने आणि 17 दिवस एवढ्या अवधीत 395 कलमे आणि आठ परिशिष्टे लिहून ते एकट्यानेच पूर्ण केले. हे टी टी कृष्णमच्चारी व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वक्तव्याने सिद्ध झालेले आहे. तो इतिहास अजूनही ताजाच आहे आणि तो शेवटपर्यंत राहणारच आहे. हे संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले त्याच दिवशी त्यातील कलम 394 प्रमाणे कलम 5,6,7,8,9,60,324,366,380,388,392,393,394 ही कलमे अमलात आली त्यानंतर उर्वरित कलमे 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. संविधानाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे की, आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.
संविधान अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण केल्यामुळे या संविधानाशी प्रत्येक भारतीय नागरिकाचे नाते जुळलेले आहे. त्याचे संरक्षण करणे आणि त्याप्रमाणे आपले हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच आपल्या कर्तव्यासही जागणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाइतका मान आणि सन्मान आपल्या संविधानाने केला आहे. सर्व जगात आपले संविधान हे उच्च दर्जाचे आणि महान ठरले आहे. आज पर्यंत भारताने राजकीय दृष्ट्या अनेक चढउतार पाहिले.
एक पक्षीय सत्ता पाहिली. आघाडी किंवा युतीची सत्ता पहिली. चीन तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध पाहिले. समाजात अनेक मतमतांतरे असताना अनेक धर्म अनेक समाज असताना अनेकतेत ऐकता, अनुभवली. तसेच एकतेत अनेकताही अनुभवली. तरीही संकट समयी सारा भारत एक होतो याचे कारण भारतीय संविधानात असून ते संविधान जागतिक कीर्तीचे कायदे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. संविधानाप्रमाणे आपली शासन व्यवस्था कार्यरत आहे. ते सर्वचजण जाहीरपणे मान्य करता परंतु त्याचवेळी काही हितशत्रू मात्र अजूनही डॉक्टर बाबासाहेबांना शत्रुत्वाच्या काळ्या चष्मा लावून पाहत असतात. त्यामुळे त्यांचे मोठेपण मान्य करण्यास त्यांना संकोच वाटतो. त्यांचा सुंब जळाला असला तरी आंबेडकरी द्वेषाचा पिंड मात्र कायम आहे. म्हणूनच ज्या दिवशी ज्या ज्या वेळी किंवा ज्यांच्याशी डॉक्टर बाबासाहेबांशी संबंध येईल त्याला बदनाम करण्याची किंवा अपमान करण्याची संधी ते सोडत नाही.
शासन आणि प्रशासनात अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असूया मनात ठेवून आहेत. त्याचमुळे शासनाने एखादे परिवर्तक जर काढले तर त्याची अंमलबजावणी न करता त्याला केराची टोपली दाखवली जाते. महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान सन्मानदिन म्हणून पाडावा असे 2008 सालीच परिपत्रक काढले आहे. परंतु शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयामधून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आणि त्याबद्दल शासन प्रशासनही उदासीनच दिसून येतात. आता आपणच जागृत राहण्याची वेळ आलेली आहे 2008 च्या परिपत्रकाची अंमलबजावणी का केली जात नाही, त्यांना कोण विरोध करतो, त्यांच्यावर राजकीय दबाव येतो का की शासन प्रशासनच त्याची टाळाटाळ करते, अकार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी का गप्प बसतात की, शासनाचे परिपत्रकच हे फक्त दिखाऊ आहे, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. एखादी सार्वजनिक निवडणूक जवळ आली की त्यावेळी मात्र वसंतात कंठ फुटणाऱ्या कोकिळेप्रमाणे काही जणांना कंठ फुटतो मग फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची आणि त्यांच्या नावाची आठवण येते, त्यांच्या. मनात नेमके काय आहे हे कोणत्याही परिस्थितीत समजून येत नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेऊन अनेक आश्वासने देऊन आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतील, आपण त्यांच्या या नरकाश्रूंना बळी पडून किंवा काहीतरी आम्ही स्वीकारून त्यांनाच मतदान करतो आणि नंतर चार वर्षे 364 दिवस पस्तावावे लागते. म्हणूनच त्यांचा डोळा जरी निवडणुकीवर असला तरी आपण मात्र अत्यंत सावध पाऊलं टाकली पाहिजे. आपल्या कृतीने त्यांना आपली आवश्यकता दाखवून दिली पाहिजे. संविधान सन्मानदिन हा केवळ बौद्धांनीच पाडावयाचा दिवस नसून सर्वच भारतीयांनी त्याचा सन्मान केला पाहिजे वैचारिक मतभेद असू शकतात पण संविधान हे सर्वांचे सर्वांसाठीच आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत भारतीय म्हणूनच त्याचे संरक्षण केले पाहिजे. हम सब एक है आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत आणि संविधान आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे.