जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती दिली असून सध्या जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत दरम्यान पुढील उपचारासाठी खडसे यांना मुंबईत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली जावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
तर पुढील काही वेळातच खडसे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
प्राप्त माहिती अशी की,दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.
जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ खडसे यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, तातडीने उपचार करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेतली. त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अम्बुलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या. काही वेळातच खडसे यांना मुंबईत आणण्यात येईल आणि त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळ गावी दरे येथील शेतात फेरफटका मारत असतानाच त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत माहिती समजली. फोन येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याबाबत आदेश दिले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहेत.
डॉक्टरांनी काय सांगितले?
जळगाव येथे एकनाथ खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर विवेक चौधरी यांनी काही माध्यमांशी संवाद केला. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. छातीत दुखणे आणि खोकला सुरू होता. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मधुमेह आणि इतर जुने आजार आहेत. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. संध्याकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रोहिणी खडसेनीं ट्विट करून दिली माहिती
एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की,माजी मंत्री आदरणीय आमदार श्री. एकनाथराव खडसे यांना गेले दोन दिवस अस्वस्थ वाटतं असल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून सावधगिरी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. काळजीचे कारण नाही.
माजी मंत्री आदरणीय आमदार श्री. एकनाथराव खडसे यांना गेले दोन दिवस अस्वस्थ वाटतं असल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून सावधगिरी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. काळजीचे कारण नाही@NCPspeaks
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 5, 2023