- जळगावात आजपासून नव कृषी तंत्रज्ञान, शेतकरी समृद्धीचा जागर
- अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन, 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन, सर्वांना मोफत प्रवेश
- पहिल्या पाच हजार शेतकर्यांना मिळणार मोफत भाजीपाला बियाणे; किचन गार्डनपासून ते शेतीपर्यंत लागणारी सर्व उपकरणे एकाच छताखाली
- आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावात शुक्रवारपासून नव कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी समृद्धीचा जागर होणार आहे. निमित्त आहे ते 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयोजित अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे. कृषी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेवून गेल्या आठ वर्षापासून कार्य करीत असलेल्या ॲग्रोवर्ल्डच्या यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 3 रोजी दुपारी 12 वाजता जैन इरिगेशन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगाबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा उपस्थित राहणार आहेत. अॅग्रोवर्ल्डचे जळगावातील यंदाचे हे नववे प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास देखील श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.
एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज ग्राऊंड येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोफत प्रवेश असेल. प्रदर्शनस्थळी दुचाकी व चारचाकी पार्किंग सुविधाही मोफत उपलब्ध असेल. प्रदर्शन 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी उपयुक्त खरेदी तसेच सर्वसामान्य नागरिकांना बचत गटांकडून दिवाळीपूर्व महत्त्वाच्या खरेदीसाठीही हे प्रदर्शन अतिशय सहाय्यक ठरणार आहे. विविध शासकीय योजनांची व कृषी उपक्रमांची माहितीही त्यातून मिळेल.
प्रदर्शनस्थळी मोफत बियाणे वाटप
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला भेट देणार्या पहिल्या पाच हजार नोंदणीधारक शेतकर्यांना निर्मल सीड्सकडून विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे. तर ओम गायत्री नर्सरी तसेच आनंद अॅग्रो केअर यांच्यातर्फे प्रदर्शनाचे चारही दिवस पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण मोफत व तात्काळ करून मिळणार आहे. शेतकर्यानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मजूर समस्येवर मात करणारा इलेक्ट्रिक बुल खास आकर्षण
इलेक्ट्रिक बैल हा यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. बियाणे पेरणी, कोळपणी, फवारणी यासारखी कामे हा इलेक्ट्रिक बैल करीत असल्याने शेतकर्यांना भेडसावणार्या मजूर समस्येवर हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. यासोबतच ड्रोनसारखी यंत्रे व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळभाज्या – भाजीपाला, बांबू अशा अनेक प्रकारच्या करार शेतीची माहिती देणार्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, मोबाईल स्टार्टर, मिल्किंग मशीन, काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.