अनुभूती स्कुलचा १३ वा फाउंडर्स डे साजरा
जळगाव – जैन हिल्स व अनुभूती स्कूल येथे गांधी पदचिन्हे दिसतात. या संस्था भवरलालजी जैन यांनी गांधी विचार आणि तत्त्व अवलंबल्यामुळे अत्यंत गुणवत्तेच्या बनलेल्या आहेत. बा-बापू १५० व्या जन्म जयंतीच्या युगात गांधी विचार शाश्वत ठेवण्याचे काम येथे झाले आहे. असे गौरवपूर्ण उद् गार माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी काढले. यावेळी अनुभूतीच्या ३०० विद्यार्थांनी सादर केलेल्या गांधी जीवन दर्शन महानाट्यातून उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
अनुभूती निवासी स्कूलच्या १३ व्या फाउंडर्स डे आणि जैन इरिगेशन व अनुभूती स्कुलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गिमी फरहाद, अनुभूती स्कुलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव उपस्थित होते. आरंभी २० विद्यार्थ्यांनी तबल्यावर जुगलबंदी सादर केली. त्याचबरोबर तीन विद्यार्थींनींनी कॅनव्हासवर तीन रंगात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडीत नेहरू या महापुरूषांचे चित्र रेखाटले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अनुभती स्कूलचे प्राचार्य जे. पी. राव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी ‘हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणं’ हे प्रार्थना गीत सादर केले. कुचीपुडी नृत्याद्वारे सरस्वती वंदना सादर झाली. विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या ‘संदेशानुभूती’ त्याचप्रमाणे ‘अंकुरानुभूती’ आणि आंत्रपिनरशिप अनुभवावर आधारित ‘इंटर्नशिप प्रोगाम’ पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्कुलच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तन्वी मल्हारा, अभिषेश यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. जे. पी. राव व मनोज परमार यांनीदेखील आंत्रप्रिन्युअरशिपबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधला. मान्यवरांच्या हस्ते गतवर्षी शैक्षणिक व शैक्षणेतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गांधी विचार संस्कार परिक्षेच्या पहिल्या दोन आलेल्या ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. डॉ. के. बी. पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले की, आदरणीय भवरलालजी जैन यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतुन लोककल्याणकारी प्रकल्प हाती घेतले. त्यांच्यावर गांधी विचारांचा संस्कार असल्यामुळे या संस्था शाश्वत बनल्या आहेत.
३०० विद्यार्थांचे महानाट्य
बा-बापु १५० जयंतीवर्षाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी गांधी जीवनदर्शन हा विषय घेऊन त्यावर वर्षभर वेगवेगळे संशोधन प्रकल्प राबले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन स्कुलच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांचे गांधी जीवनदर्शन सांगणारे महानाट्य सादर झाले. या वैशिष्ट्यपुर्ण नाटकामध्ये संगीत, नृत्य, भारतीय संस्कृती, गाणे यांचा चपखल उपयोग करून अत्यंत प्रभावी असे गांधी जीवन दर्शन घडले. अंधाराची भिती त्यातून आलेले राम नाम, वडिलांच्या सोन्याच्या कड्याची केलेली चोरी, पत्रातुन कबुल केलेला गुन्हा यासह मोहन ते महात्मा असा सुरम्य प्रवास विद्यार्थ्यांनी महानाट्याद्वारे उपस्थितांसमोर सादर केला. यावेळी उपस्थितीत असलेले अनुभूती स्कुलचे विद्यार्थी पालक व निमंत्रीत मंत्रमुग्ध झाले.