यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई, पिकांचे नुकसान झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान सप्टेंबर महिन्यात पाऊस ‘जोरधार’ बरसल्याने राज्यातील अनेक भागामध्ये पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांची पीक देखील चांगले आहेत. पण आता यावर्षीचा पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे मात्र त्या आधी पाऊस काही भागांमध्ये चांगलाच कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.
अरबी समुद्रात सध्या चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून वारे प्रचंड वेगाने वाहत आहेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पण येत्या २४ तासात समुद्रातील चक्रिवादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात तसेच पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गोव्यापासून कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा परतीचा प्रवास नेमकं कोणत्या तारखेपासून सुरु होणार याबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. गोवा आणि कोकणात येत्या ४८ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होणार असून पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रातून जमिनीपर्यंत आल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.