राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, त्या उपक्रमांतून जनतेला लोक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाव, त्यांच्या अडी-अडचणी दूर करता याव्यात. यासाठी शासनाने गतवर्षीपासून सेवा महिना हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्य शासनाकडून हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीही राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या यशस्वीतेनंतर प्रशासन पातळीवर ‘सेवा महिना’ हा कार्यक्रम राबवत शासन जनतेप्रती कायमच बांधील असल्याचे अधोरेखित आहे.
सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावीत, यासाठी राज्य शासनाने 2015 पासून ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेची कामे वेळेत पूर्ण होण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. राज्य शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक गतिमानतेने मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने गतवर्षी 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत ‘सेवा पंधरवडा’ राबविला होता व त्याला पुढे 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणे तसेच त्यांना योजनांचा योग्य लाभ देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी यावर्षी पुन्हा एकदा 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत ‘सेवा महिना’ उपक्रम राबवण्यात येत आहे.
‘सेवा महिना’ उपक्रमात समाविष्ट सेवा
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधींचे लाभ देणे, वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांति योजने अंतर्गत सिंचन विहिरींकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, त्यासोबतच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे यांचा समावेश ‘सेवा महिना’ उपक्रमात करण्यात आला आहे.
या सेवा महिन्यात संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व 15 सप्टेंबर 2023 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहीम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांची वरील विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासन यंत्रणेकडे पाठपुरावा करावा.
आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल, विभागाच्या स्वत:च्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज, सेवा महिन्यामध्ये यावर्षी नमूद केलेल्या सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, सखी किट वाटप, लसीकरण, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग या विभागांकडील तसेच सर्व शासकीय विभागाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवाविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी उपसि्थत राहणार आहेत. तसेच त्यासंबंधीच्या सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत. सेवा महिना कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन, त्यामधील नागरिक आणि प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे. सेवा महिन्यात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेत त्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या सेवा महिन्यात सर्व विभागांच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
*****
प्रभाकर बारहाते
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी