जळगाव,(प्रतिनिधी)- यंदा महाराष्ट्रात जून महिन्याच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले होते. दरवर्षी ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात धोधो बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली. यामुळे सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला.
मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. दरम्यान, आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे. राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला. सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सून माघारी फिरत आहे.
महाराष्ट्रातून कधी परणार मान्सून
महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता तर संपूर्ण देशातून 20 ऑक्टोंबरपर्यंत माघार शक्य असल्याचं सांगण्यात येतं आहे. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. आज २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला .