दिल्ली – स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतंच… या स्वप्नाला बळ देणारी योजना केंद्र शासनाच्या विचारधीन असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत केंद्र सरकार गृह कर्जावर सबसिडी देण्याचा विचार करत असल्याची माहिती ‘रॉयटर्स’ने दिली आहे.
केंद्र सरकार पुढील ५ वर्षांसाठी लहान शहरांतील घरांसाठी अनुदानित कर्ज देण्यासाठी ६० हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. बँका ही योजना काही महिन्यांत सुरू करण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेर महत्त्वाच्या राज्यांच्या आगामी निवडणुका व तोंडावर असणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ही योजना सुरू करण्याची शक्यतावर्तवली आहे.
पंतप्रधान मोदींनी ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. मात्र, या योजनेची माहिती समोर आली नाही. या योजनेत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर ३ ते ६.५ टक्के वार्षिक व्याज अनुदान दिले जाईल. तर ५० लाख रुपयांपेक्षा कमी गृह कर्ज, २० वर्षांच्या कालावधीसह योजनेसाठी पात्र असतील. सदर योजने बाबत अद्याप कुठलाही शासन निर्णय काढण्यात आला नसून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.