जळगाव,(प्रतिनिधी)- मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिचा आत्याच्या मुलासोबत विवाह लावून देण्यात आला. याशिवाय ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना देखील तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याने पतीपासून ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीसह तिचे आई – वडील, आत्या आणि मामा अशा सर्वांविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई वडीलांनी तिच्या आत्याच्या मुलासोबत लावून दिला होता. विवाहानंतर ती मुलगी कात्रज पुणे येथे सासरी पतीसोबत गेली. जून 2022 ते सप्टेबर 2023 या कालावधीत तिच्यासोबत पतीने शरीर संबंध प्रस्थापीत केले. त्यामुळे ती अल्पवयीन असतांना गर्भवती झाली. या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे येथील हे.कॉ. रविंद्र ओझय्या चिप्पा यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत पुण्याला गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जामनेर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सागर काळे करत आहेत.