बंगळुरू(कर्नाटक)- कर्नाटकमधील 15 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे. काँग्रस नेते डीके शिवकुमार म्हणाले की, ‘जनतेने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जवळ केले आहे’. पोटनिवडणुकीत भाजपने 12 जागांवर विजय मिळवला तर 2 ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. दुसरीकडे होसकोटे मतदारसंघात एका अपक्षाने विजय मिळवला आहे.
निवडणुकीनंतर विधानसभेत 222 जागा होतील आणि बहुमतासाठी 112 चा आकडा पार करावा लागेल. त्यामुळे, भाजपसाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्वाची होती. महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळवूनही विरोधी बाकात बसलेल्या भाजपसाठी कर्नाटकातील पोटनिवडणुका अतिशय महत्वाच्या होत्या. 5 डिसेंबरला झालेल्या पोटनिवडणुकीत 15 जागांसाठी 165 उमेदवार मैदानात होते. बीएस येदियुरप्पांच्या भाजपा सरकारसाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्वपूर्ण होती. 223 सदस्य असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी भाजपला 7 आमदारांची गरज होती. जुलैमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या एकूण 17 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे एचडी कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर बीएस येदियुरप्पांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले. त्या आमदारांना अयोग्य माणनून उच्च न्यायालयाने त्यांच्यावर निवडणुका लढवण्यास बंदी घातली. पण, सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये त्यांना निवडणुका लढण्यास परवानगी दिली.
काँग्रेस-जेडीएसमधून आलेल्या 15 पैकी 13 बंडखोरांना भाजपचे तिकीट
भाजपने काँग्रेस-जेडीएची साथ सोडून आलेल्या 15 बंडखोरांपैकी 13 जणांना पक्षाकडून उमेदवारी दिली. होसकोटे मतदारसंघात शरथ बचेगौड़ा भाजपातून वेगळे होऊन अपक्ष निवडणूक लढले. येथून भाजपने काँग्रेसमधून आलेल्या माजी आमदार एमटीबी नागराज यांना उमेदवारी दिली. मैसूरुच्या हुंसुर मतदारसंघातून जेडीएसचे माजी प्रदेशाध्यक्ष एएच विश्वनाथ यांना उमेदवारी दिली.