जळगाव,(प्रतिनिधी) – शहरातील MIDC येथील उद्योजकांना २० ते ३० लाखांची मागणी करणाऱ्या ‘तोतया’ GST जीएसटी अधिकाऱ्याला उद्योजकांनीच शुक्रवारी पकडून MIDC पोलिसांच्या ताब्यात दिले.जीएसटी विभागाचा निरीक्षक असल्याचे सांगत गुरुवारी काही कंपन्यामध्ये कागदपत्रांची पडताळणी देखील या ‘तोतया‘ अधिकाऱ्याने केल्याचे समजते.महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेले वाहन घेऊन हा तोतया अधिकारी कंपन्यांमध्ये जाऊन धमक्या देत होता. तो त्याचे नाव भाऊसाहेब ठाकरे असे सांगत आहे.
ओळखपत्र मागताच तोतया बिथरला…
GST निरीक्षक सांगणारा तोतया अधिकारी उद्योजकांना वारंवार त्रास देत होता दोन दिवसांपूर्वी तो अशोक मुंदडा यांच्या कंपनीत आला व त्याने कागदपत्रांची पाहणी केली, तसेच नाशिक येथील अधिकाऱ्याच्या नावाने तडजोडीची मागणी केली. त्याने थेट ३० लाख रुपये मागितले. त्याच्यावर संशय आल्याने मुंदडा हे सावध झाले. तो शुक्रवारी पुन्हा येणार असल्याने त्यांनी अन्य उद्योजकांना बोलवून ठेवले होते.शुक्रवारी पुन्हा हा तोतया अधिकारी ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेले वाहन (क्र. एमएच १९, सीवाय ००२५) घेऊन कंपनीत पोहचला. त्यावेळी त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता त्याच्या चेहऱ्यावरचा रंगचं उडाला,तो ओळखपत्र दाखवू शकला नाही. त्यावेळी त्याची उलट तपासणी केली असता, तो माहिती देऊ शकला नाही.
तोतया अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्याच्या मोबाइल व कारची तपासणी केली असता, त्याच्या कारमध्ये अनेक कागदपत्रे सापडली. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता, त्यात वेगवेगळ्या उद्योजकांकडे पैशांची मागणी केल्याचे चॅटमधून समोर आले आहे.