उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई– कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनंती केली असली तरी वैधानिक प्रक्रियेनुसार असा नामविस्तार करण्यासाठी मा. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच विधिमंडळात ठराव मंजूर करणे आवश्यक असल्याचे सोमवारी आपण त्यांच्या निदर्शनास आणले, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी दिली.
आपल्या सूचनेचा मा. उद्धव ठाकरे यांनी स्वीकार केला असून आगामी नागपूर अधिवेशनात विधिमंडळात असे विधेयक मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असेही ते म्हणाले. मा. राम नाईक यांनी मुंबईत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यावेळी उपस्थित होते.
मा. राम नाईक म्हणाले की, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे, असे वृत्तपत्रात वाचनात आले. या पार्श्वभूमीवर आपण सोमवारी मंत्रालयात मा. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व नामविस्ताराविषयी वैधानिक प्रक्रियेची माहिती दिली.
ते म्हणाले की, राज्यपाल कुलपती असलेल्या कोणत्याही राज्यातील विद्यापीठाच्या नावात फेरबदल करावयाचा असल्यास त्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विद्यापीठ कायद्यात नामबदलाचा प्रस्ताव सादर करावयास पाहिजे. हे सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर केल्यानंतर ते मा. राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवावे लागते. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तसे विधेयक मांडून मंजूर करावे आणि ते राज्यपालांकडे पाठवावे.
मा. राम नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सूचनेबद्दल आपले आभार मानले आणि संबंधित विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले.
मा. राम नाईक यांनी मा. उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशातील डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालयाच्या नावात बदलाच्या प्रक्रियेसाठी आपण त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कशा प्रकारे वैधानिक प्रक्रिया पार पाडली याचीही माहिती दिली.