जळगाव,(प्रतिनिधी)- स्वत:चे SWOT विश्लेषण म्हणजेच आत्मपरिक्षण करा. आपली शक्तीस्थाने, कमजोरी काय आहेत दोन्ही जाणून घ्या, आपल्याला काय संधी आहेत आणि काय धोखे आहेत हे हि तपासा, त्यानंतर काय करायचे आहे त्याचा विचार करा. कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणार्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याची शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात आणू नका. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात, अन्याय झाला – केला गेला अशी भावना मनात येऊ शकते, अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका.
उलट जिगर दाखवा. यशस्वी व्यक्तीला यश का मिळाले याचा अभ्यास करा. जगातील सर्वोत्तम गोष्टीतून काय घ्यायचे त्याला महत्व आहे. तसेच एकाकीपण हा घातक असतो. त्यापासून दूर राहा. आयुष्यात रीलॅक्स व्हायला शिका. तणावमुक्त असल्याशिवाय काही साध्य करता येणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निराशेच्या गर्तेत गेलेला माणूस सुद्धा बदलू शकतो. आयुष्य फक्त गुलाबाचा प्रवास नाही, आयुष्यात काटे आहे हा निराशावाद आहे, फक्त गुलाब आहे हा आशावाद आहे, पण गुलाबासोबत काटेही आहे हा प्रयत्नवाद आहे, तेव्हा आपण आशावादी अथवा निराशावादी न होता प्रयत्नवादी बना असा सल्ला दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सल्लागार मंडळावर असलेले ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांनी मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना दिला.
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल ग्रेट भेट उपक्रमा अंतर्गत रविवारी ते कुसुंबा येथील प्रकल्पात “Born To Win” या विषयावर जाहीर व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र नन्नवरे, संचालक डॉ.रुपेश पाटील, नुकतीच मंत्रालयात क्लर्क पदावर नेमणूक झालेली मनोबलची विद्यार्थिनी अनुराधा गेबड आणि यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. या प्रसंगी अनुराधा गेबड आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सचिन शेंडे यांचा सत्कार डॉ.निरगुडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यजुर्वेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचालन सौरभ बोबटे याने केले.
यजुर्वेंद महाजन प्रास्ताविकात बोलतांना असे म्हणाले कि, स्वप्न पेरणारा आणि ति स्वप्न उगवण्यासाठी योगदान देणारी व्यक्ती म्हणजे डॉ.उदय निरगुडकर.विद्यार्थ्यांमध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन आज केले आहे.
व्यक्तिमत्वाला उजाळा देण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, जसे करवतीला धार करत राहणे आवश्यक असते. आज जग झपाट्याने बदलत आहे, आजचा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यासाठी नियोजन हवे, चलता है वृत्ती नको. खंबीर मन हवे, घेतलेला निर्णय अंमलात आणता यायला हवा, ज्ञानलालसा हवी. जिंकण्यापेक्षा तुमची वृत्ती महत्वाची आहे. स्वप्न बघून काही झोपून जातात तर काही स्वताला झोकून देत जागृत होतात. देवळातली प्रदक्षिणा आणि मॉर्निग वॉक यात मोठा फरक आहे, तो म्हणजे भाव. तुमच्या मनात काय भाव आहे यावर तुमचं यश अवलंबुन आहे. तुमची स्पर्धा शेजाऱ्याशी, मित्रांशी नाही तर जागतिक आहे, तेव्हा तुमची गुणवत्ता हि जागतिक दर्जाचीच असली पाहिजे. ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही, सर्व काही चोरी होवू शकते, पण ज्ञान आणि कला कुणीही चोरू शकत नाही. बरेचश्या गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात, तेव्हा कायम सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. त्रस्त, व्यस्त, सुस्त आणि मस्त हे व्यक्तिमत्वचे प्रकार असून मस्त माणसावरच समाज चालतो.आज घेणारे असाल, पण उद्या देणारे व्हायचं आहे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
डॉ.उदय निरगुडकर यांनी अनेक बाबी दृष्टांत देत सांगितल्या. भाषणातील मुद्दे उदाहरणे देत, विनोद पेरत, नाट्यपूर्ण रीतीने सांगत, त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमा प्रसंगी प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनी नजनीन शेख हिने सुंदर गाणे सादर केले. कार्यक्रमांनंतरही त्यांनी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधला.