जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील बेसुमार अवैध वाळू उपसा नेहमीच चर्चेत असतो…. गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी मुद्दा राज्यभरात गाजतो दरम्यान नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आल्यापासून अवैध वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली जात असून शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात केलेली सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली.
५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त….
बांभोरी गावातून ५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त केले. तसेच ठिकठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली आहे.पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने पहाटे पाच वाजताच गावात पोहोचले व कारवाईची धडक मोहीम राबवली.
कारवाई नंतर या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याविषयी चौकशी सुरू असून या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.