मुंबई, दि १९ : महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख अतिथी असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असणाऱ्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरुप :
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.
सत्कारमूर्तींची माहिती :
रतन टाटा : टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद भूषविलेल्या रतन टाटा यांचे भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. जग्वार, लॅण्ड रोव्हर, कोरस ग्रुप ऑफ स्टील कंपनी यासारख्या बड्या परकीय कंपन्यांची खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. स्टील, ऑटोमोबाईल्स, टी कंपनी, लक्झरी हॉटेल्स, एरोनॉटिकल अशा विविध उद्योग क्षेत्रात टाटा उद्योग समूहाचे नाव आहे. ‘टेटली’ ही टी बॅग्ज बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपास आली आहे. दानशूर उद्योगपती म्हणूनही रतन टाटा यांचा लौकिक आहे.
आदर पुनावाला : सातत्यपूर्ण संशोधन आणि नाविन्याचा शोध घेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आदर पुनावाला यशस्वी झाले आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ही सर्वाधिक रोगप्रतिबंधक लसीचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची उत्पादने ३५ देशांत निर्यात होतात. ‘ओरल पोलिओ लस’ ही जागतिक बाजारपेठेत बेस्ट सेलर ठरली आहे. डेंग्यू, फ्ल्यू, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधक लसीचे उत्पादन, त्याचबरोबर कोविशिल्ड लसीचे उत्पादन करून त्यांनी आत्मनिर्भर भारताची प्रचिती दिली आहे.
गौरी किर्लोस्कर : आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती संपादन केलेल्या किर्लोस्कर घराण्याचा संपन्न वारसा वृद्धिंगत करण्यात गौरी किर्लोस्कर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, गज्जर मशीनरीज आणि पंप उत्पादक, अर्का फिनकॉर्प तसेच पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाचे दिमाखदार पदार्पण करण्यात गौरी किर्लोस्कर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
विलास शिंदे: कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात एमटेक केल्यानंतर शेती हा मुख्य व्यवसाय विलास शिंदे यांनी निवडला. शेतीतज्ञ, कृषीमाल बाजारपेठ तज्ञ, व्यवस्थापन तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ या कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारी तसेच टोमॅटो प्रक्रिया करणारी कंपनी म्हणून नावारूपास आणली. प्रक्रियायुक्त शेती उत्पादनाची 42 देशांमध्ये निर्यात, सह्याद्री फॉर्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेड या कंपनीत 310 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आणण्यात यश.