नाशिक,(प्रतिनिधी)- राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती प्रक्रिया दरम्यान तलाठी भरतीचा पेपर फुटल्याची खळबजनक बातमी समोर आली आहे.शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन परीक्षेला विचारण्यात आलेल्या परीक्षेतील काही प्रश्नांचे फोटो परीक्षा केंद्राबाहेर फिरणाऱ्या संशयिताकडे आढळल्याने या तलाठी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.
परीक्षा केंद्रात बसलेल्या साथीदाराला मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील प्रसंगांप्रमाणेच हायटेक पद्धतीने कॉपी पुरविणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील संशयिताला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले असून त्याच्याकडन वॉकी टॉकीसह दोन मोबाईल टॅब ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरीरोडवरील शिव प्लाझा इमारतीतील ‘वेब एजी इन्फोटेक’ या केंद्रावर तलाठी भरतीसाठी गुरुवारी ऑनलाईन परीक्षा सुरू असताना संशयित गणेश शामसिंग गुसिंगे यास परीक्षा केंद्राच्या आवारात हेडफोन लावन फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील चित्रण केलेले प्रश्नांसह दोन मोबाईल, सिम कार्ड, हेडफोन तसेच वॉकी टॉकी अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता गणेश गुसिंगे हा परीक्षार्थीना हायटेक पद्धतीने कॉपी पुरवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राज पाचोरकर यांनी दिली..
Comments 1