जळगाव । गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे. या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शनिवारी, दि.५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पिडिताच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीडिताच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन तर करण्यातच येईल मात्र त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधील आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जसीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून महिनाभरात निकाल लावण्यात येईल.
शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ ही देण्यात येईल. असे ही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या घटनेनंतर आरोपीला अटक करून घेऊन जाताना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. पोलीस व्हॅनवर अनावधानाने दगडफेकीची घटना झालेली होती यावर पोलीस विभागाने चार ते पाच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गावकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत. अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले.