मुंबई । मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. धमकी येताच मुंबई पोलिस सतर्क झाले असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले.
त्यावेळी नियंत्रण कक्षात कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस शिपायाने फोन करणाऱ्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली. कोणत्या ट्रेनमध्ये आणि कुठे बॉम्ब ठेवला? असं महिला पोलिसाने या व्यक्तीला विचारलं. त्यावर संबधित व्यक्तीने कोणतंही उत्तर दिलं नाही. मात्र, त्याने कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.