भडगाव । तालुक्यातील एका गावात सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. तर पाचोरा भडगाव तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही आज अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित केला. आणि संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या कुटुबींयांशी संपर्क साधला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
विधानसभेच्या अविधेशनात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आरोपीला अटक झाली आहे. तो सुटणार नाही, यासाठी व्यवस्था आपण केली आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सारखा चांगला वकील देवू. यामध्ये त्यावर कठोर कारवाई होईल. एकदम कडक कारवाई होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आश्वासन दिलं.
यावेळी पीडित मुलीच्या काकूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना रोष व्यक्त केला. तुम्ही कधी वकील लावणार, कधी कारवाई करणार, त्यापेक्षा संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचं काय करायचं बघून घेवू, असं त्या म्हणाल्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोरात शिक्षा होईल, असं आश्वासन दिलं.