मुंबई । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस असून सभागृहात भाजपच्या महिला आमदार आणि शिंदे गटातील नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
यात चिडलेल्या फरांदे यांनी अध्यक्ष महोदय… जे वाचत नाही आणि बोलतात ना… त्यांना जरा शिकवा… अशा शब्दात गुलाबराव पाटलांना सभागृहात उत्तर दिलं.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. लोकप्रतिनिधींच्या निधीतून महानगरपालिका क्षेत्रात बांधण्यात येणार्या व्यायायशाळा, अभ्यासिका, आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते. या भाडे आकारणीमध्ये कपात करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बऱ्याच वेळ चर्चा झाली. त्यांच्या लक्षवेधीला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. मात्र, फरांदे यांनी यावर हरकत घेतली. अशातच उदय सामंत यांच्या मदतीसाठी गुलाबराव पाटील आले.
अध्यक्ष महाराज सर्व मंत्री तयारी करुन येतात. मात्र एकाच लक्षवेधीवर इतकी चर्चा झाली तर अन्य विषयांवर अन्याय होतो, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर देवयानी फरांदे भडकल्या. अध्यक्ष महोदय मी इतक्या पोटतिडकीने बोलतेय. मी राज्याची लक्षवेधी मांडली आहे, काय चाललयं हे, जे वाचत नाही आणि बोलतात ना, त्यांना जरा शिकवा, असं म्हणत फरांदे यांनी संताप व्यक्त केला.