मुंबई । राज्यातील गृह खात्याने पोलीस दलातील भरतीबाबात एक मोठा निर्णय घेतला असून मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. ही भरती ११ महिन्यांसाठी असणार असून याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
पोलीस दलात कंत्राटी भरती करण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची गरज आहे. तसेच पुढच्या काळात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, रमाजान आणि दिवाळी सारखे सण येऊ घातलेत. यासाठीच ही कंत्राटी भरती केली जाईल, असं सांगितलं जातंय.
मुंबई पोलिसांकडे सध्या मनुष्यबळाची तीव्र टंचाई झालीये. मुंबई पोलीस दलातील भरतीत शिपाई पदापासून ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आलीत. मात्र यातील १० हजार पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या पोलिसांना सर्व ठिकाणी पोहचण्यात अडचणी येतायत. मनुष्यबळा अभावी पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागाने हा निर्णय घेतलाय.