मुंबई | मनी लॉनड्रिंग प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
फडणवीस सरकारमध्ये एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीतील एक भूखंड त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी आणि सौभाग्यवती मंदाताई खडसे यांनी विकत घेतला होता. या प्रकरणी खडसे यांनी गैरमार्गाने हा व्यवहार सुरळीत करण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता.
यातून त्यांना जून २०१६ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर याच प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासामध्येच खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ७ जुलै २०२१ रोजी अटक केली असून ते आजवर कारागृहात आहेत. तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना जामीन मिळालेला आहे.
हे पण वाचा..
जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन! अपघातग्रस्त तरूणांसाठी ठरले देवदूत
‘हा’ प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ५० व्या वर्षी बनला चौथ्यांदा बाबा ; पोस्ट करत दिली गोड बातमी
मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता स्वस्तात मिळणार तांदूळ, निर्यातीबाबत घेतला हा निर्णय?
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली धक्कादायक माहिती
दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर गिरीश दयाराम चौधरी यांच्या वतीने अनेकदा जामीनासाठी अर्ज करण्यात आला. यात पहिल्यांदा पीएमएलए तर नंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल अर्ज फेटाळण्यात आले आहेत. गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज आधी पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. येथे देखील त्यांना अर्ज १० एप्रिल रोजी फेटाळण्यात आला होता.
त्यांनी सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधीज्ज्ञ मोहन टेकावडे यांनी गिरीश दयाराम चौधरी यांची बाजू मांडली. यात त्यांनी श्री. चौधरी यांच्यावर वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा युक्तीवाद केला. हा युक्तीवाद मान्य करत गिरीश चौधरींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांना सुप्रीम कोर्टातर्फे दिलासा मिळाला आहे. अर्थात, हा दिलासा एकनाथराव खडसे यांना देखील मिळाल्याचे मानले जात आहे.