मुंबई | आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अपत्रतेची नोटीस बजावली आहे. विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे.
मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं होतं.
या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. या पत्राला आमदार निलम गोर्हे आणि मनिषा कायंदे यांना पुढील १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.