जळगाव । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना अर्थखातं दिल्यानंतर त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी अजित पवार यांच्या फायली मुख्यमंत्रीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नजरेखालून जाणार असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील महाविकास आघाडी सरकारच्या वेळीस अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं. त्यावेळी अजितदादांनी शिवसेनेच्या आमदारांना अत्यंत कमी निधी दिला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांना भरमसाठ निधी दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सरकारमध्ये होऊ शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे. यातच गुलाबराव पाटील यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलले.
हे पण वाचा..
फोटोचा नाद जीवावर बेतला ; समुद्राच्या लाटांमध्ये पत्नी गेली वाहून.. थरकाप उडवणारा VIDEO पहा
एकनाथ खडसेंचा आमदार मंगेश चव्हाणांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा
चोरीच्या सहा दुचाकीसह दोन अल्पवयीन मुलांना अटक ; जळगाव शहर पोलिसांची कारवाई
आता सत्तेत तीन वाटेकरू झाले आहेत. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील. हा निर्णय योग्य असल्याचं सांगत अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही गुलाबराव पाटील यांनी केलं.
म्हणजे अजितदादांनी मंजूर केलेली फाईल दोन चाळणीतून जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. यामुळे अजित पवार यांना मंत्रिमंडळात नगण्य स्थान आहे काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.