मुंबई । शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या भावी शिक्षकांसाठी खुशखबर असून राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
ही शिक्षकभरती दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचं काम रखडलं होतं, आता हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे, त्यामुळे शिक्षक भरतीचे परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार आहे, असं मंत्री दीपक केसकरांनी सांगितलं आहे.
.
राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यानंतर शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भऱती करण्यात येईल असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं.
तसेच आधार वेरिफिकेशनचं काम झाल्यानंतर राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचं चित्र होतं. पण आता करण्यात आलेल्या घोषणेनंतर आता तरी या शिक्षक भरतीला वेग येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.