जळगाव / मुंबई : राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नेहमी ७ जूनपर्यंत राज्यभरात पसरणारा मान्सून २५ जून रोजी राज्यात आला. त्यानंतर तो सर्वत्र बरसलाच नाही. जळगाव जिल्ह्यात देखील अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाहीय.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र मात्र काही दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने पेरण्या करण्यात आल्या होत्या.
का कमी झाला पाऊस
यंदाच्या मोसमी पावसावर “एल निनो”चे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनोमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात सरासरी इतका पाऊस झाला आहे.
तसेच ८ ते १२ जुलै दरम्यान मान्सून पुन्हा कमकुवत असणार असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुप कश्यप यांनी म्हटले आहे. परंतु १२ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हिंगोली, अकोला, सांगली, जालनामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यानंतर चंद्रपूर, अमरावती, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर अन् जळगावमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. नागपूरमध्ये जवळपास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली.