बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं धक्कादायक वास्तव अहवालात समोर आलं आहे.
बस चालक दानिश याच्या शरीरात मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३० टक्के जास्त होते असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एबीपी माझाने याबाबतच वृत्त दिलं आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावती येथील रीजनल फॉरेंसिक सायन्स लँबोरिटिने यासंदर्भातला फॉरेन्सिक तपास केला आहे.
ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे. मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे 1 जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या त्या बसचा अपघात 30 जून आणि 1 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला होता. फॉरेन्सिक टीमने बस ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्ताचे सॅम्पल 1 जुलैला दुपारच्या सुमारास घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झालं असावं असे तज्ज्ञांना वाटतं. म्हणजेच अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण अहवालात नमूद करण्यात आलं, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता आहे.