जळगाव । तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जिल्ह्यातील १३०० दुकानांतून नवीन सेवा सुरू करण्यात येणार असून या नवीन सेवा सुरु करण्याबाबत रेशन दुकानदारांना आदेश दिले आहेत. बँकिंग सेवा सुरु होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता यापुढे रेशन दुकानातून पैसे काढण्याची सुविधा मिळेल
राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत रेशनिंगच्या ग्राहकांना बँकिंग सुविधा देण्याबाबत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना आदेश दिले आहेत. मात्र, सुविधा देण्याविषयी लागणारी यंत्रणा कोठून व कशी आणायाची यांसह विविध अडचणी रेशन दुकानदारांसमोर आहेत. जिल्ह्यात सध्या एक हजार ३०९ दुकानांच्या माध्यमातून बँकेतील पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, तसेच पैसे काढण्यासाठी तालुका पातळीवरही जाण्याची गरज राहणार नाही.
प्रशिक्षण मिळणार
विविध बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांना काम करता येणार आहे. त्यामुळे त्यांना मार्गदर्शनासह प्रशिक्षितही करण्यात येणार आहे. “रेशन दुकानदारांनी बँकिंग सुविधा सुरू करण्याचे आदेश आहेत. मात्र, दुकान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या आहेत. त्याची लवकरच बैठक होणार आहे. नागरिकांना पैशांची गरज भासल्यास गावातील रेशन दुकानातून पैसे काढता येणार आहेत.” -संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव
पुढील रेशन दुकानांवर सेवा मिळतील
तालुका–रेशन दुकाने
जळगाव–१६१
मुक्ताईनगर–१२१
बोदवड–३३
पाचोरा–६१
चाळीसगाव–६६
जामनेर–६५
एरंडोल–१४०
धरणगाव–७६
भुसावळ–४६
भडगाव–९२
अमळनेर–१३४
यावल–६७
चोपडा–७६
रावेर–७६
पारोळा–८७
या मिळतील बँकिंग सेवा
रेशन दुकानात अस्तित्वात असलेल्या पॉस मशीनच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे, इतर मूल्यवर्धित बँकिंग सेवा रेशनिंग व्यवस्थेतील ग्राहकांना मिळणार आहेत. रेशन दुकानात बँकेच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सोयीनुसार आणि शारीरिक व मानसिक त्रासाशिवाय या सेवेचा लाभ घेता येणार आहे.