नेहमी अतरंगी आणि बोल्ड ड्रेसमध्ये दिसणारी उर्फी जावेद यावेळी पारंपरिक कुर्त्यामध्ये दिसल्याने नेटिझन्सना मोठा धक्का बसला. अनेकांनी मजेशीर कमेंट करत उर्फीचं कौतुक केलं आहे.
दरवेळी कपड्यांमुळे ट्रोल होणारी उर्फी यावेळेस अशा अवतारात समोर आली आहे ते पाहून सर्वच अवाक् झाले. फोटोग्राफर्सच्या म्हणण्यानुसार, तिचा नवा अवतार पाहून ‘जनता खुश हो गयी..’ एवढंच नव्हे तर तिचा लूक पाहून एक बाईकही कोसळली…! यातला मजेचा भाग सोडला तर बाकी सगळं खरं आहे. यावेळी मीडियासमोर आलेली उर्फी छोट्या किंवा अतरंगी कपड्यांमध्ये नव्हे तर पूर्ण कपड्यांमध्ये तेही सलवार सूटमध्ये दिसली.
उर्फीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर भलताच व्हायरला झाला आहे. अनेक मीडिया पोर्टल्सनीही त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्याच्यावर युजर्सच्या भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत. लव्हेंडर कलरच्या या सलवार सूटमध्ये उर्फी खूप सुंदर दिसत आहे. कर्ल केलेले केस मोकळे सोडून, ग्लॉसी मेकअप, मोठे झुमके आणि मॅचिंग हाय हिल्स घालून उर्फीने तिचा लूक पूर्ण केला आहे. तिचा हा नवा लूक फॅन्सना खूप आवडला असून अनेकांनी तिची स्तुती देखील केली आहे.