मुंबई । राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. याची प्रचिती काल महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आली. काल घडलेल्या राजकारणातील सत्ता नाट्यांनंतर अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून नेमकं राज्याच्या राजकारणात काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवारांच्या सल्ल्याने नवे विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड याची निवड झाली. मात्र यानंतर आता अजित पवार यांच्या गटाने प्रतोदपदी एका नेत्याची निवड केली आहे.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन प्रतोद पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्याच गटाचा व्हीप लागू होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.
खुद्द अनिल पाटील यांनी सदर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. आता अनिल पाटील व्हीप बजावतील, असे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर अजित पवारांचे बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.