मुंबई : मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे.
त्यांच्यासोबत सोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम अदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांनी शपथ घेतली
दरम्यान, 2019 पासून राज्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. 2019 पासून राज्यात तीन सरकार सत्तेत आले. यातील तीनही सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. 2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सरकार स्थापन झालं. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण काहीच दिवसात अजित पवार यांचं बंड मोडीत निघालं. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्येदेखील अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील झाले आहेत.
जळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळाले
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यात जळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळाले आहे. अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.