मुंबई । मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर कुठे तुरळक पावासाच्या सरी बरसल्या. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाजही आहे. या काळात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडून नंतर जोर कमी होईल. पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.