जळगाव । राज्यात गेल्या वर्षी शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. आणि एकनाथ शिंदे गट व भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केलं होते. आता शिवसेनेतील बंडाला वर्ष झाला असून याबाबत, सध्याच्या राजकारणाबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘माझा कट्टा’वर विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी किंवा आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात फिरून आमदारांची मते जाणून घेतली असती तर शिवसेनेत फूट पडली नसती, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
शिवसेनेत घडामोडीमुळे दु:खही वाटते आणि आनंदही वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेबांचे विचार, मराठी माणूस, हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जात होतो. मात्र, आम्ही निर्णय घेतल्याने शिवसेनेला पुन्हा त्याच्या मुख्य मुद्दावर आणले असल्याचा आनंद वाटत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे हे सात-बारावरील वारस असू शकतात. पण, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असेही पाटील यांनी म्हटले. सूरतला गेलेल्या काही आमदारांना पुन्हा बोलवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आमदार सूरतला निघून गेले असल्याचे पाटील यांनी म्हटले. पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही, आमदारांना का थांबवलं नाही, असा प्रश्न आपल्याही पडला असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला. राऊत यांच्यासारखी माणसं कोणालाही पुढं येऊ देत नाहीत. त्यांच्या सारख्या माणसांमुळे पक्षाचे नुकसान होते. ह्यांच्या डोक्यात कायम पदाचा विचार असतो. आम्ही विविध आंदोलने केली, अनेक गुन्हे अंगावर घेतली. राऊत यांनी किती आंदोलने केली, किती गुन्हे आहेत असा सवाल त्यांनी केला.