जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात विनापरवाना खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व साठवणूक करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. कृषी विभाग गेल्या काही दिवसांमध्ये ‘ऍक्शन मोड’ असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अवैध, बोगस बियाणे, खते असो की विना परवाना खते व कीटकनाशक असो कृषी विभाग कारवाई करतांना दिसत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये हाच यामागचा उद्देश असून शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे आवश्यक आहे.
दरम्यान जळगाव शहरा जवळच असलेल्या तालुक्यातील आव्हाने गावात विनापरवाना शेती उपयोगी खते व कीटकनाशके घरोघरी जाऊन विक्री व अनधिकृत जागी साठवणूक केलेली असल्याचे गुप्त माहिती कृषी विभागाच्या जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळाली सदर माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याची नियोजन करण्यात आले.
जिल्हा व तालुका भरारी पथकातील सदस्य अरुण तायडे, जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक, विजय पवार मोहीम अधिकारी, श्री शिवाजी राऊत ,तालुका कृषी अधिकारी जळगाव, मिलिंद वाल्हे ,मंडळ कृषी अधिकारी, धीरज बढे कृषी अधिकारी पंचायत समिती अमित भामरे कृषी पर्यवेक्षक, बालाजी कोळी दीपक झंवर कृषी सहायक यांनी आव्हाने गावातील सदर अनधिकृत गोदामातील वेलसन फार्मर फर्टीलायझर कंपनीचा 1543257/-किमतीचा खत व कीटकनाशक साठा जप्त केला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन ,खोटे नगर या ठिकाणी अरुण तायडे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.